Marathi Short Story
श्रावण महिना आला की सुवासिनी स्त्रियांना वेध लागतात मंगळागौरीचे. विशेष करून नवविवाहित तरुणींना. तिलाही मंगळागौरीचे खेळ खेळायला आवडायच. सुनिलराव त्यांचा श्रावणसखी हा मंगळागौरीचे खेळ सादर करणारा ग्रूप होता. दरवर्षी ती आपल्या सखींबरोबर मंगळागौरीचे खेळ खेळायला जात होती.पण या वर्षी ते शक्य नव्हतं. कारण ती जाऊ शकत नव्हती.
ती बेड वर पडल्या पडल्या विचार करत होती. तेवढ्यात सुनील राव रूममध्ये आले.
सुनील: वैशू काय ग कस वाटतंय आता? काही त्रास होतोय का?
वैशाली: नाही हो इतका नाही , आता थोडा त्रास तर होणार ना.
वैशाली क्षिण आवाजात म्हणाली.
सुनिलराव वैशालीच्या डोक्यावरून हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यात पाणी असते .
वैशाली : अहो रडू नका ना. मग माझा धीर खचतो. आणि आपल्या मुलांनी काय करायच. कोणाच्या तोंडाकडे पहायच त्यांनी.
सुनील: नाही पहावत ग तुला अशा अवस्थेत? काय होऊन बसलं हे ? गेल्या दोन महिन्यात आपलं आयुष्य किती बदललं . श्रुतीच लग्न ठरलं म्हणून तु किती खुश होतीस. पण अचानक हे दुखणं उद्भवलं आणि आणि…
सुनिलरावांना पुढे बोलणं अवघड झालं होतं.
वैशाली: अहो शांत व्हा ना. पाणी घ्या थोडं. अहो मला नाही वाटत मी आता बरी होईल . मला तुमची काळजी वाटते हो. तुम्हाला कधी एकट सोडलं नाही हो मी. मी कधी माहेरीही नाही राहिले. सगळ्यांना वाटायच तुम्ही मला राहू देत नाही. पण मलाच तुमच्याशिवाय करमत नाही हे त्यांना माहित नव्हतं.
सुनिलराव: हो ना मलाही कुठे तुझ्याशिवाय करमायच. मी ऑफिस मधून यायची वेळ झाली की तु आधीच दरवाजा उघडून माझ्या स्वागताला हजर असायची.
वैशाली: आणि तुम्ही माझ्यासाठी न चुकता मोगऱ्याचा गजरा आणायचात. आपल्या अशा छोटया छोटया गोष्टीतून आपलं प्रेम वाढत गेल. आपल्याला कधी डेट वर जायची गरज नाही वाटली की कधी मोठया हॉटेल्स मध्ये जायची गरज वाटली.
सुनिलराव: ना तु कधी माझी तक्रार केलीस की मी तुला वेळ देत नाही म्हणून ना मी कधी तक्रार केली की तु माझं ऐकत नाही.
वैशाली: हो ना आपल्याला मिळणारे छोटे छोटे क्षण ही आपण भरभरून जगलो. मुलांना मोठ केलं. त्यांना पंख फुटले आणि गेले ते उडून . आणि नशीब पण साथ देत नाही माझं .मी पण चालले तुम्हाला सोडून.
सुनिलराव: वैशू असं नको बोलूस. काही होणार नाही तुला. मी काहीच होऊ देणार नाही तुला.
वैशाली: नको हो आता हा त्रास नाही सहन होत. मला एक वचन द्याल का?
सुनिलराव: हो बोल ना काय हवं आहे तुला?
वैशाली: आधी वचन द्या.
सुनिलराव: बर बाई दिल वचन. बोल काय हवयं तुला?
वैशाली: आमचा ग्रूप आहे ना श्रावणसखी त्यात निलू आहे… नीलिमा पटवर्धन.
सुनिलराव : हो अग ठाऊक आहे मला . तिच काय?
वैशाली: अहो ती एकटिच असते हो . मला असं वाटतं… म्हणजे तुम्ही चिडू नका हो पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आणि नीलिमा …
सुनिलराव: वैशाली काही ही काय बोलतेस? अग समाज काय म्हणेल आणि आपली मूल …ती काय म्हणतील?
वैशाली : कोणी काही म्हटलं तरी ते येणार आहेत का तुमची काळजी घ्यायला? सांगा ना येणार आहेत का आपली मूल? वरूण तर साधा मला भेटायला देखील आला नाही. श्रुती तरी एकदा येऊन गेली पण तीने ही तिची कारणं सांगितली आणि तुम्हाला तिकडे न्यायला सुद्धा नकार दिला.मला तुमची काळजी वाटते हो आणि तुम्ही मला वचन दिले आहे ना. मग मोडणार का तुम्ही. माझा प्राण नाही जाणार हो.
सुनिलराव : असं काय बोलतेस तु अग डॉक्टर म्हणाले आहेत की त्यांनी नवीन ट्रीटमेंट जी सुरु केलीय ना त्याने तुला नक्की बर वाटेल.
वैशाली: डॉक्टर काहीही सांगू दे मला आता माझं मरण डोळ्यांनी दिसतंय आणि तुम्ही माझी शेवटची इच्छा नाही पूर्ण करणार का?
सुनिलराव: बर बाई जशी तुझी इच्छा.
वैशाली: अहो अजून एक इच्छा आहे माझी. आमच्या ग्रुपचा खेळ बघायचा आहे मला. तुम्ही बोलवता का त्यांना इथे?
सुनिलराव: मला डॉक्टराना तस विचारावं लागेल . विचारतो मी .
सुनिलराव डॉक्टरांना विचारून वैशाली यांचा ग्रूप हॉस्पिटल मध्ये बोलावतात. श्रावणसखी ग्रूप मस्त खेळ सादर करतात. वैशाली अगदी आनंदाने त्यांचे खेळ पाहते. खेळ संपल्यानंतर वैशाली त्यांच्या ग्रूप मध्ये असलेल्या नीलिमा ला जवळ बोलावतात . तसेंच सुनिलरावांना ही बोलावतात. नीलिमा चा हात सुनिलरावांच्या हातात देतात आणि आनंदाने या जगाचा निरोप घेतात.
